Monday, November 23, 2009

फर्शी

उशीखालच्या ह्या रुमालात
कुठला स्पर्श शोधु
घड़ी घातलेले अंथरुण
अजुन लोळत पडले आहे
कुणाच्या डोळ्यावर
दोन थेंब पाणी शिपंडू?

तो कंगवा मख्ख
त्या आरश्याकडे पाहत बसलाये
जणु अजुन सकाळ व्हायचीये
कुठल्या गप्पांमधे
कपाट गुतंलाये
किती आवरावर अजुन व्हायचीये

पंखा हा जुनाट
नेहमीसारखं गरगरत थकलाये
तरी घामाचा एकही बिंदु
अंगावर नाही
विजेचं बटन घालवायला
कुणी साफ़ विसरलय

दार अस उघडं
मोकळं आकाश घेवुन
भिंतीच्या पाटीला टेकलय
नशीब या फर्शीने
आतावर तरी
माझं वजन पेलवलय

Thursday, November 19, 2009

कृपार्थीक

आज रात्र किती प्रकाशमय
सोबत रातराणीची
सुवास या पहाटेचा
दरवळतोये ह्या गगनी

सुर्याची कोमल किरणे
डोकावतायेत त्या टेकडीमागुनी
पक्षी सोडतायेत घरटी
भरारी एकच नवी

गजबजले हे सारे रस्ते
सडे नी रांगोळ्यांनी
प्रभातिक हे दृश्य
मनोहर ह्या भुवनी

कांतीला स्नान
स्मरण माझ्या प्रभुचे
सुरेख असा मी ओसंडून वाहतोये
कृपार्थीक या जगती

Monday, November 16, 2009

दिवस

मी मृत आहे
नी निजलेला
जाणीव नसे ज्याला
आज दिवस कुठला

रवी आहे उभा
काळ सरकत ठाई
काटे गोल का फिरतात
मज उमजत नाही

किती समज कुणी
जरी पुढ्यात मांडिली
संवेदनेचा संवाद आता
पडद्यावर उमटत नाही

पाउलांच्या आठवणी
ठश्यात विरुनी गेल्या
समुद्राच्या घडित
आता आवेग नाही

अंतर किती आज
मी गाठीले आहे
मी आहे तोच जुना
हा प्रश्नच उरत नाही

बाकी आहे काही
या भागाकारात सख्या
तुझ्या या शब्दानां मात्र
अर्थाची सावली नाही

या अंधारात सारे
हरवून बसलो
आता चांदणीचा उजेड
मला भावत नाही

ज्या नक्षत्रात
आपण कधी रमलो - हरपलो
आता तो मौसम परतणे
शक्य नाही

जे होते भाग्यी
ते सारे जीवन जगलो
आता या रात्रीत नवीन
दिवस नाहीत