Tuesday, March 31, 2009

शिदोरी

कधी कधी शब्दांना
खंरच मी खूप त्रासतो,
भावनांचा आवेग
नी चहाचा कप,
कसा कागदावर मांडावा
या साठी भांडतो.
आपण जगतो
म्हणजे नेमंक काय करतो?
चार गोष्टी नी चार व्यक्ति
जपता येतील,
हाच एक प्रयत्न
कदाचित सदैव असतो.
पण हे आठवणींचे भांडवल
जरा नेहमीच विचित्र वागते,
नेमंक नको तेव्हा
टाचणी मनात टोचते,
अश्रु नसले तरी कसेसेच होते
अचानक पोटात एक गोळा देवून जाते.
मित्रा आपण किती
पोरके नी भटके झालोयेत,
दूर जगाच्या कोपरयात
जाऊन बसलोयेत;
तरी कुठली ती शिदोरी
जी अजुन पुरतेये?
हा प्रश्न जागा झाला की
एक गाणे गुंजते -
तुझी आठवण मज येते
तालात विलीन होते,
हरपुन माझे जीणे
कुणी हृदयात निनादते.

Saturday, March 21, 2009

देवा

भूक नको भाकर दे
दौलत नको श्रम दे,
माणसाला माणुस होता येईल
देवा एवढे प्रेम दे।
सोनेरी सकाळ नी उब दे
दोन थेंब पावसाचे नी मातीचा गंध दे,
होइल उराला पुरे
देवा एवढे प्रेम दे
थोडी थंडी नी लोकर दे,
हुरडा हिरव्या गव्हाचा
नी ऊसाला रस
देवा एवढे प्रेम दे
उन्हाळा नी शुभ्र कापूस दे,
भुइमोंग नी तुरीच्या
सोबतीला आंबा ही भरपूर
देवा एवढे प्रेम दे
आम्ही तुझी देणी फेड्त नाही
वर मुजोरीलाही घाबरात नाही,
तरी भक्ति आणि क्षमा होईल
देवा एवढे प्रेम दे
कत्तल सारी चोहिकडे
अंहकार आमचा जुमानत नाही,
आम्हा लहणांना समज येईल
देवा एवढे प्रेम दे

Sunday, March 15, 2009

माझे मन

किती माफक माझे प्रेम
मोजमाप रोज भावनांचे,
तू हसलीस की रुसलीस
हाच एक हिशेब असे;
पौर्णिमा असली तरी अंधार
नि अंधारात दिवाळी,
सारी तुझी किमया
माझे मन निंबाचे झाड़ जसे
किती छोटे माझे आकाश
भरारी फक्त स्वप्नांचीच,
तुझ्या बाहुपाशात
सारे जग संपते;
सूर्य रोज उगवतो
सोनेरी दिवसही येतो,
तुझीच ही जादूगिरी
माझे मन रंगीत रुमाल असे
किती सीमीत माझी पृथ्वी
पाउलांच्याच रेषा उमलतात,
पारसबाग नी अंगण तुझे
यात सारे विश्व वसे;
ऋतु हिरवा बहरतो
ग्रीष्मात फुलतो,
चक्र तुझे हे सारे
माझे मन धूलिकणाचे ठसे
किती कमी माझे हे अश्रु
वाहतांनाही लाज भासे,
तुझी स्मृति नी आठवण
हाच एक विषय असे;
दुःख बोलावता येते
एकटेपणा हे पाणी सींचते,
तुझेच हे देणे सारे
माझे मन मग माझे कसे?

Thursday, March 12, 2009

तुझे स्मित

गंमत आहे बुवा
भरल्या बाजारात मी एकटा,
कोण हरवले आहे
हे कळत नाही;
किलबिलाट नी गोंधळ
धुंद हवेमधे,
आवाज कुणाचा का
ऐकू येत नाही?
जल्लोष जसा एक
मनी बहरला,
पावसाचा थेंब
नी गंध पसरला!
मुग्ध मोहित मी
ठाकलो उभा,
कोण गायले ते बालगीत
सर आणि मीही ओला!
हे वेड - ही बेधुंदी
स्पर्श आहे नवा,
अंकुर दगाडातुनी
फुटतोय देवघना;
किती बागडू
नी कुठे नाचू,
अधीर आतुर
चंद्र म्हणा मला।
स्वप्न कांचन
आज गवसला कुणा?
मी माझाच न राहिलो
तर शोभ का हवा;
बाग असो की बाजार
एकच प्रीत भासे मला
तुझे स्मित शोधत फिरतोये
आठवले आता मजला।





Friday, March 06, 2009

चंद्र

काठावरती बसलोये

वाट पाहत तुझी,

चंद्रही स्थिरावला पाण्यावर

कहाणी ऐंकत माझी;

तू येशील का ग परत?

एकदा हलकेच हसुया,

डोकावला फोटो तुझा आज जसा

तसेच ते क्षण जगुया?

नाही तू येणार नाहीस

हे मला प्रतीत आहे,

तू असलीस तरी नाहीयेस

हे सत्य बिलगून आहे;

प्रेम केलेस का तू मजवर

हा सवाल मुळीच नाही,

मीच चुकलो असेन कधी

हे गृहीत आहे।

गवतावरती लोळीत

आता मध्यरात्र झाली,

दव साचीले की अश्रु गोठीले

उत्तरासाठी प्रश्नच उरत नाही;

झाले मार्ग विलग

तरी खुणा उरतात का ग?

ऋतु अगदीच एवढे बेपर्वा

नेहमी वागतात नाही ग!

जाऊ देत पहाटही उगवेल

नी प्रकाशही दाटेल लवकरच,

लपवलस तरी दोन थेंब

ढळतील आपुले अलगद;

सतत हसणे भाग्याशी आले

हे थोडी काही वाईट आहे,

झरा, नदी, सागर, पाउस

अरे चंद्रा - तुला सार माहितच आहे!