किती माफक माझे प्रेम
मोजमाप रोज भावनांचे,
तू हसलीस की रुसलीस
हाच एक हिशेब असे;
पौर्णिमा असली तरी अंधार
नि अंधारात दिवाळी,
सारी तुझी किमया
माझे मन निंबाचे झाड़ जसे।
किती छोटे माझे आकाश
भरारी फक्त स्वप्नांचीच,
तुझ्या बाहुपाशात
सारे जग संपते;
सूर्य रोज उगवतो
सोनेरी दिवसही येतो,
तुझीच ही जादूगिरी
माझे मन रंगीत रुमाल असे।
किती सीमीत माझी पृथ्वी
पाउलांच्याच रेषा उमलतात,
पारसबाग नी अंगण तुझे
यात सारे विश्व वसे;
ऋतु हिरवा बहरतो
ग्रीष्मात फुलतो,
चक्र तुझे हे सारे
माझे मन धूलिकणाचे ठसे।
किती कमी माझे हे अश्रु
वाहतांनाही लाज भासे,
तुझी स्मृति नी आठवण
हाच एक विषय असे;
दुःख न बोलावता येते
एकटेपणा हे पाणी सींचते,
तुझेच हे देणे सारे
माझे मन मग माझे कसे?
No comments:
Post a Comment